पुणे : अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या गुंडांना मंगळवारी पोलीस आयुक्तालयात बोलावून सक्त ताकीद देण्यात आली आहे. बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
गेल्या पाच वर्षात अशा स्वरुपाचे गु्न्हे दाखल झालेल्या सराइतांना मंगळवारी पुणे पोलीस आयुक्यालायत बोलावून त्यांची झाडाझडती घेण्यात आली. गेल्या पाच वर्षात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ६१४ सराइतांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी १५० ते २०० गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालायात बोलावून सक्त ताकीद देण्यात आली आहे. अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सराइत गुन्हेगारांना सक्त ताकीद
तसेच सराइत गुन्हेगारांना एक फॉर्म भरण्यास दिला असून त्यामध्ये वास्तव्यास असलेला भाग, पत्ता, नातेवाईक, साथीदारांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. शहरात गोळीबाराची घटना घडता कामा नये, अशी सक्त ताकीद सराइत गुन्हेगारांना पोलिसांनी दिली आहे. एखाद्याकडे पिस्तूल असेल तर, त्याची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन देखील पोलिसांनी दिले.