दौंड: ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करून दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दौंड शहरात बुधवारी (ता.2) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी एका 24 वर्षीय विद्यार्थिनीने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज यशवंत वेलणकर व संतोष बाडकर (दोघेही रा. पानसरेवस्ती, दौंड, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 74, 351(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी उच्च पदवी घेतली असून सध्या त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. फिर्यादी या दौंड शहरात कुटुंबासोबत राहतात. दरम्यान, बुधवारी घरातील किराणा माल संपल्याने फिर्यादी या सामान आणण्यासाठी गेल्या होत्या. दुकानातून सामान घेऊन घरी परत जात असताना, आरोपींनी फिर्यादी यांना पाहून कमेंट करत केस व ओढणी ओढली. तसेच त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली.
त्यानंतर आरोपींनी झालेला प्रकार जर कोणाला सांगितला, तर तुला जिवे मारू, अशी धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी त्वरित दौंड पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. त्यानुसार दोन्ही आरोपींच्या विरोधात विनयभंगासह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शेख करीत आहेत.