चांदवड : तालुक्यातील वडनेरभैरव, लोदाई वस्ती येथील सामाईक शेतजमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारीची घटना घडली आहे. याप्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाल्याने पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकदेव लहानू तिडके (वय ६५, रा. वडनेरभैरव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी ३ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शेत गट नं. ४१९ मध्ये ते ट्रॅक्टरने मशागत करीत असताना संशयित साहेबराव लहानू तिडके, मयूर अरुण तिडके, योगेश साहेबराव तिडके, अरुण साहेबराव तिडके (सर्व रा. लोधाई वस्ती, वडनेरभैरव) यांनी शेतात येऊन या शेतात तुम्ही रोटर मारायचे काम बंद करा, असे म्हणून सुकदेव तिडके व त्यांचा मुलगा वसंत तिडके यांना काठीने डोक्यात, पाठीवर, हातावर व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली.
तर साहेबराव लहानू तिडके (वय ७६, रा. वडनेरभैरव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेत गट नं. ४१९ या सामाईक शेताच्या वाटणीवरुन वाद असून सुकदेव लहानू तिडके, वसंत उर्फ पप्पू सुकदेव तिडके (रा. लोदाई वस्ती, वडनेरभैरव) हे या शेतात ट्रॅक्टरने मशागत करीत असताना तेथे जाऊन त्यांना सामाईक क्षेत्र असल्याने यात रोटर मारु नको, असे समजावून सांगण्याचा राग आल्याने त्यांनी साहेबराव तिडके व साक्षीदार यांना काठीने पाठीवर, पोटावर व. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणात दोन्ही पक्षाकडून एकमेकांविरोधात फिर्याद देण्यात आल्याने पोलिसांनी दोन्ही पक्षातील एकूण सात संशयितांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आवारे व पोलीस नाईक टी. टी. पारधी करीत आहेत.