अहमदनगर : नगरमधील कासीम खान मशिदीमधील चोरीची उकल करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. धर्म शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलानेच मशिदीत चोरी केल्याचे समोर आले आहे. या चोरीच्या गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील अल्पवयीन मुलाचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन दिवस तपासात सातत्य ठेवल्याने या चोरीची उकल शक्य झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
कासीम खान मशिदीत २८ नोव्हेंबरला चोरी झाली होती. मशिदीमधील कार्यालयात असलेले कपाट ड्रील मशिनने तोडले होते. कपाटातून ७७ हजार १०५ रुपयांची रोकड चोरीला गेली होती. मुश्ताक अब्बास पठाण (वय ५०, रा. सीआयव्ही सोसायटी, मुकुंदनगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. मशिदीत चोरी झाल्याने त्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या टीमसह मशिदीत झालेल्या चोरीच्या स्थळाची बारकाईने तपासणी केली. यात काही बाबींची त्यांनी नोंद केली. यानंतर मशिदीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर अगोदरच कट केल्याने चित्रीकरण होऊ शकले नाही. मशिदीच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पूरक माहिती मिळाली.
सीसीटीव्हीचे कोतवाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. यात गुन्ह्याशी निगडीत बरेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. यानंतर गुन्ह्याच्या उकलीसाठी तपास पथक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे रवाना झाले. तेथून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. अल्पयवीन मुलाकडे चौकशी केल्यावर त्याने पोलीस चौकशीत चोरीची माहिती दिली. मशिदीतून चोरलेले ७७ हजार रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले कटर पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहे. पोलीस नाईक ए. पी. इनामदार हे अधिक तपास करत आहेत.
शेअर मार्केटच्या नादात गमावले पैसे..
शेअर मार्केट मध्ये गुंतवण्यासाठी नातेवाईकांकडून विधी संघर्ष ग्रस्त बालकाने काही रक्कम घेतलेली होती. ती रक्कम हरल्यानंतर नातेवाईकांचे घेतलेले पैसे देण्यासाठी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, सलीम शेख, शाहीद शेख, अभय कदम, सुजय हिवाळे, अतुल काजळे मोबाईल सेलचे राहुल गुंडू हे पथक कारवाईत सहभागी झाले होते.