मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याची आज तिहार जेलमधून सुटका करण्यात आली. जुलै महिन्यात त्यांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर सुमारे ५ महिने ते तिहार तुरुंगात होते. आठ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
३० जून २०२२ रोजी संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त आहेत.
राष्ट्रीय शेअर बाजारातील अधिकारी व कर्मचाऱ्याचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह त्यांच्या आई संतोष पांडे व मुलगा अरमान पांडे यांच्यावर सीबीआयने नुकताच गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयानेही पांडे यांच्यावर मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला. याशिवाय ईडीने एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना याच प्रकरणात अटक केली होती.
ईडीने पाच जुलै रोजी पांडे यांची एका प्रकरणात चौकशी केली होती. आता ईडीने सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने शुक्रवारी पांडे यांच्या घरी तसेच एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण आणि रवी नरेन यांच्यासह अन्य काही जणांच्या घरांवर छापेमारी केली होती. देशात मुंबई, पुण्यासह जवळपास १८ ठिकाणी ही कारवाई झाली होती. यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे, लॅपटॉप व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले.