उरुळी कांचन (पुणे) – पूर्व हवेलीत कौटुंबिक वादातून महिला डॉक्टर व तिच्या ६ वर्षाच्या चिमुकलीचा, डॉक्टर पती व सासऱ्याने विनयभंग केल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. उच्च शिक्षित कुटुंबात अशा प्रकारची तक्रार दाखल झाल्याने, उरुळी कांचन, लोणी काळभोरसह एकच खळबळ उडाली आहे.
महिला डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी महिला डॉक्टरांचे सासरे व डॉक्टर पती यांच्या विरोधार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियादी डॉक्टर महिला या ऑक्टोबर महिन्यात पूर्व हवेलीतील एका बड्या गावात (सासरी) गेल्या होत्या. तेव्हा महिला डॉक्टरांच्या पतीने त्यांना घरात घेतले नाही. व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गळा दाबुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पती पत्नीत वाद चालू असतानाच, वादात मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासऱ्यांनी डॉक्टरांच्या खांदयावर हाताने मारहाण करुन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, महिला डॉक्टरांना मारहाण होत असल्याचे पाहून, आईला वाचविण्यासाठी भांडणात आलेल्या ६ वर्षाच्या मुलीचाही विनयभंग करण्याचा प्रयत्न महिला डॉक्टरांच्या पतीने व सासऱ्यांनी केला. तसेच महिला डॉक्टर व तिच्या दोन मुलांना घरातून हाकलून दिले. दरम्यान, महिला डॉक्टरांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.