नाशिक : नाशिक-सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला. या दुर्घटनेत चार ते पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, बचावकार्य सुरू केले आहे. शिंदे – पळसे टोल नाक्याजवळ हा अपघात झाला.
भरधाव वेगात येणाऱ्या एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि त्याने धावती बस चार ते पाच दुचाकीस्वारांच्या अंगावर घातली. त्यात हे दुचाकीस्वार चिरडले गेले आहेत. या भरधाव बसने समोरून येत असलेल्या एका एसटी बसला देखील जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये चार ते पाच दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तसेच बसने देखील पेट घेतला आहे. बसमधील काही प्रवासीदेखील गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी बसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी बसच्या आपत्कालीन खिडकीतून बाहेर उड्या घेतल्या.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे. स्थानिक नागरिकदेखील मदत करत आहेत. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.