भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नं. १ (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत चालकाचे चारचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीने महामार्गावर तीन ते चार पलट्या मारल्या, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकएकजण गंभीर जखमी झाला आहे.
संदिप राजाभाऊ माळी (वय – ३५,रा. रा. गातेगाव ता. जि लातुर), बालाजी केरबा तिडके (वय – ४८ रा. महावीर सोसायटी, लातुर ता. जि लातुर) सरस्वती राजाभाऊ माळी वय- ६१,रा. गातेगाव ता. जि. लातुर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तर चंद्रकांत रामकिसन गवळी वय – ५४ व्यवसाय नोकरी रा. दिपज्योतीनगर ता. जि. लातुर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप माळी, बालाजी तिडके, सरस्वती माळी व चंद्रकांत गवळी हे चौघेजण पुणे -सोलापूर महामार्गावरून अश्विनी हिचे होणारे पती सम्राट गोरे यांचे नवीन घराची वास्तुशांतीकरीता लातूर या ठिकाणावरून पुण्याला निघाले होते.
पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नं. १ (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आले असता, संदीप माळी यांचे चारचाकी गाडीवरील नियंत्रन सुटले व पुण्याकडे जाणाऱ्या बाजूला चारचाकी गाडीने तीन ते चार पलट्या मारल्या यामध्ये गाडीतील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. जखमी चंद्रकांत गवळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दडस पाटील करीत आहेत.