नांदेड : नांदेड – किनवट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि आयशरचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना सोनारी फाटा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे शनिवारी (ता.२४) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरात सध्या रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे काम करण्यासाठी बिहार व परराज्यातील मजूर आले होते. हिमायतनगर येथून टेम्पोमधून विद्युत लाईनचे साहित्य घेऊन मजूर भोकर येथे चालले होते. या दरम्यान हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे आयशर टेम्पोला भरधाव वेगातील सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास जबर धडक दिली.
या अपघातात मूळचे बिहारमधील असलेल्या ४ मजुरांसह एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना सोनारी येथील युवकांनी बाहेर काढून सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
दरम्यान, नांदेड – किनवट राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनांना वेग मर्यादा नसल्याने वाहने भरधाव वेगाने चालवली जातात. राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर, वाहनांना वेग मर्यादा लावणे. तसेच मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी करावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.