बार्शी : बार्शी – लातूर बायपास रोडवर बी. आय. टी. या इंजिनियर कॉलेजच्या चौकात दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एका ४५ वर्षीय व्यक्तींचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हि घटना रविवारी (ता. ०९) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
रामचंद्र फकीर बचुटे (वय-४५, रा. गुळपोळी, ता. बार्शी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघात एवढा भिषण होता कि या अपघातात दुचाकी चालक बचुटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र बचुटे हे शेतकरी आहेत. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या ताडसौंदरे या ठीकाणी कामानिमित्त गेले होते. सदर ठिकाणाचे काम उरकून गुळपोळी या ठिकाणी येण्यासाठी निघाले होते.
दरम्यान, लातूर बायपास रोडवर बी. आय. टी. या इंजिनियर कॉलेजच्या चौकात सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भरवेगात निघालेल्या ट्रकला बचुटे चालवीत असलेल्या दुचाकीने पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये ते रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने गुळपोळीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.