पाटणा : बिहारमध्ये मोठा अपघात झाला असून या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत.
अपघातग्रस्तांना केंद्र सरकार आणि बिहार सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
हाजीपूर जिल्ह्यातील देसरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सुलतानपूर गावात रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं हा अपघात झाला.
ही घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्याकडून या अपघातावर शोक व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, अपघातग्रस्तांना केंद्र सरकार आणि बिहार सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
पाटणापासून तब्बल 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वैशाली जिल्ह्यात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रस्त्याला लागूनच असलेल्या गावातील काही लोक स्थानिक देवता ‘भूमिया बाबा’ची पूजा करण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच असलेल्या पिंपळाच्या बाजूला एकत्र जमले होते.
त्याचवेळी भीषण अपघात झाला. भरधाव येणाऱ्या ट्रकनं पूजेसाठी एकत्र जमलेल्या लोकांना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आरजेडी आमदार मुकेश रोशन यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती.