पुणे : खाजगी सावकाराच्या २८ लाखांच्या अवाजवी कर्जाच्या मागणीमुळे शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीने सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कुरूंगवडी (ता. भोर) येथे घडली आहे. सावकारी कर्जाच्या फासात अडकलेल्या व्यक्तीच्या आत्महत्येने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सतीश बाजीराव शिळीमकर (वय ४३, रा. कुरंगवडी, ता. भोर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर याप्रकरणी सतीशची पत्नी वैशाली सतीश शिळीमकर यांनी नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार खाजगी सावकार अमृत महादेव शिळीमकर (रा. तांभाड, ता. भोर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश शिळीमकर याच्या पँटच्या डाव्या खिशात लिहलेली चिठ्ठी मिळून आली. या चिठ्ठीत तांभाड येथील अमृत शिळीमकर हे घेतलेल्या कर्ज व व्याजापोटी २८ लाख रुपयांची मागणी करत असून पैसे न दिल्यास जमीन नावावर करून द्यावी, अशी मागणी सापडलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान, व्याजाने घेतलेल्या पैशाचे मागणीला, धमकीला व जाचहाटाला कंटाळुन सतिश शिळीमकर यांनी आत्महत्या केली आहे. अशी तक्रार वैशाली यांनी नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आरोपी अमृत शिळीमकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सुतनासे करत आहेत.