दिनेश सोनवणे
दौंड (पुणे) : दौंड येथे एका मुस्लिम विधवा महिलेशी वाल्मिकी समाजातील तरुणाने लग्न केल्यानंतर त्याची बळजबरीने सुंता केल्याची धक्क्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे दौंड शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दौंड शहर पोलीस ठाण्यात तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुमेल कुरेशी, आसिफ शेख आणि डॉक्टर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी बबलू मिलिंद चव्हाण (वय ३४, हल्ली रा. परदेशी बिल्डिंग, कुंभार गल्ली, दौंड) यांनी दौंड शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
दौंड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू चव्हाण हे कुर्डुवाडी (ता.माढा, जि. सोलापूर) येथे वीट भट्टीत २०१८ साली मजुरी करत होते. वीट भट्टीत मजुरी करत असताना तेथील एका मुस्लिम समाजाच्या विधवा महिलेबरोबर विवाह केला.
दरम्यान, आरोपी कुमेल कुरेशी याला ही माहिती समजल्यानंतर संबंधित महिलेला म्हणाला कि, तुझे मुस्लिम कुटुंबातील व्यक्तीशी लग्न लावून देतो, असे सांगितले मात्र त्या महिलेने कुरेशी याचा निरोप फेटाळला. परंतु, कुरेशी मात्र हा सातत्याने त्या दोघांवर दबाव आणत होता.
त्यानंतर आरोपी कुमेल कुरेशी याने त्याचा साथीदार आसिफ शेख व एका डॉक्टरला बरोबर घेऊन बळजबरीने बबलू चव्हाण याची १४ ऑक्टोबर २०२० ला सुंता केली. सुता केल्यामुळे चव्हाण कुटुंब घाबरले होते. त्यानंतर त्यांनी कुठेही वाच्यता केली नव्हती. मात्र आता बबलू चव्हाण यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिन्ही आरोपींच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व इतरही विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.