पुणे : पुणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यात स्वतंत्र ‘सायबर कक्ष’ स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील सर्व ३१ पोलीस ठाण्यांमध्ये आता सायबर कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे आता सायबर गुन्ह्यांना आळा बसणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
पुणे पोलिसांकडे सायबर गुन्ह्यांच्या दरवर्षी सरासरी २० हजार तक्रारी येतात. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारातील सायबर पोलीस ठाण्यात दररोज साधारणपणे १०० तक्रारी येण्याचे प्रमाण आहे. सायबर गुन्ह्यांना बळी पडणा-या नागरिकांची संख्या, गुन्ह्यांची वाढती व्याप्ती आणि शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यावर पडत असलेला भार पाहता. प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर कक्ष सुरू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतला होता.
शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील पाच कर्मचारी तसेच एका अधिकाऱ्याला सायबर गुन्हे नोंदवून घेणे, तसेच सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. परदेशातून भेटवस्तू, परदेशात नोकरी, गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री आणि विवाह अशी आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक तसेच ई-मेल हॅक करणे, समाजमाध्यमात बदनामी, लोनॲपद्वारे तत्काळ कर्ज, लोनॲपच्या कर्जानंतर होणारे आर्थिक आणि लैंगिक शोषण अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, एका कंपनीच्या चीफ मॅनेजरने शिवाजीनगर ठाण्याच्या सायबर टीमकडे तक्रार केली. त्यांना मुंबई येथील हॉटेल बुकिंग करायचे होते. त्याकरिता त्यांनी गुगल सर्च करुन तेथे उपलब्ध मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता सायबर गुन्हेगाराने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या क्रेडिट कार्डचा ओटीपी घेऊन त्यांच्या अकाऊंटमधून फ्लिपकार्टद्वारे २ लाख ९४ हजार ३८९ रुपयांची खरेदी केली.
त्यानंतर या तक्रारीच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर टीमने तत्काळ फ्लिपकार्टला मेल करून तक्रारदार यांच्या क्रेडिट कार्डमधून गेलेले २ लाख ८९ हजार १९७ रुपये रिफंड करण्यात यश मिळविले आहे. शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये सायबर कक्ष स्थापन झाल्यानंतर यशस्वी झालेली ही पहिलीच केस म्हणता येईल.
नागरिकांनी अनोळखी / अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. तसेच जर आपली फसवणूक झाली तर सायबर तक्रारींची नोंद http:/cybercrime.gov.in या पोर्टलवर किंवा १९३० या हेल्पलाईनवर तत्काळ नोंदवा. असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.