पुणे : कात्रज येथील ओंकार सोसायटीमध्ये उच्चदाबाच्या उपरी वीजवाहिनीचा धक्का लागून जखमी झालेल्या ऋषिकेश मंजूनाथ पुजारी या १४ वर्षीय बालकाचा उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी राज्यच्या जिल्हा विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. या अपघाताचा तांत्रिक निरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून दोषींविरोधात नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच मृताच्या कुटुंबियास आर्थिक मदत करण्यात येत आहे.
ओंकार सोसायटीच्या रस्त्याच्या कडेने उच्चदाबाची २२ केव्ही कात्रज-कोंढवा वीजवाहिनी गेली आहे. गेल्या रविवारी (दि. २३) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास या उपरी वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का बसून ऋषिकेश जखमी झाला होता.
याबाबत महावितरणच्या पद्मावती विभाग कार्यालयाकडून राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयास कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे विद्युत निरीक्षकांनी या जागेची पाहणी केली असून त्यांच्याकडून तांत्रिक निरीक्षण अहवाल लवकरच कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, महावितरणच्या संबंधित अभियंत्यांनी या जागेची पाहणी केली असून यामध्ये उपरी तारमार्ग स्वरुपाची असलेल्या वीजवाहिनीचे रस्त्याच्या बाजूच्या जमिनीपासूनचे अंतर योग्य असल्याचे दिसून आले. वीजवाहिनी असलेल्या ठिकाणच्या रस्त्यालगत १० ते १२ फूट उंच भिंत बांधण्यात आली आहे.
तसेच भिंतीच्या आतील बाजूस भराव टाकल्यामुळे वीजवाहिनीचे जमिनीपासूनचे अंतर कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. भिंतीच्या आतील परिसर वापरात नसल्याने तेथे झाडेझुडपे वाढलेली आहे. सोसायटीच्या आतील बाजूने ऋषिकेश भिंतीवर गेला असावा व उपरी वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का बसला असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.