पुणे : स्वारगेट- सांगोला एसटी बस मद्यधूंद अवस्थेत चालकाने तब्बल ६२ किलोमीटर चालविल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी (ता.३) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना न झाल्याने बसमधील ५२ प्रवाशांचा जीव वाचला आहे.
याप्रकरणी चालक संतोष विश्वंभर वाघमारे (वय-32 रा. लातूर आगार, सांगोला) याला नीरा पोलिसांनी अटक केली आहे. चालकाला ताब्यात घेत नीरा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष वाघमारे हे एसटी बस चालक आहेत. वाघमारे हे स्वारगेट-सांगोला बस दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकातून घेऊन निघाले. बस स्थानकाबाहेर येताच दुभाजकाला धडकली. मात्र, त्यावेळी काही जाणवले नाही.
पुढचा प्रवास सुरु झाल्यानंतर बस सतत झोल मात होती. कधी वेग जास्त तर कधी रेस करत बस पळत होती. पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वेपासून बस नागमोडी चालू लागली. एका ठिकाणी तर बसने ट्रकला कट मारला. त्यानंतर बस डांबरी रस्ता सोडून साईडपट्टीवरुन धावत होती. यामुळे चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.
पिसुर्टी रेल्वेच्या परिसरात ट्रकचा कट बसल्याने बस रस्ता सोडून चालू लागल्याने प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही प्रवासी आणि वाहकाने चालकाला बस थांबवण्यास सांगितले. चालकाने ६२ किलोमीटरचे अंतर सुसाट वेगात बस पळवून ५२ प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केला होता.
दरम्यान, पुणे विभागाचे लाईन चेकर नीरा परिसरात होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन चालक संतोष वाघमारे याला ताब्यात घेत नीरा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिले.