पिंपरी : दापोडी येथे मागील दोन दिवसापूर्वी दुहेरी हत्याकांडाचे गूढ उलघडण्यास भोसरी पोलिसांना यश आले आहे. सहा वर्षापूर्वी आईवरील झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलानेच दाम्पत्याची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
शंकर नारायण काटे (वय- ६०) आणि संगीता शंकर काटे (वय- ५५) अशी हत्या झालेल्या पती- पत्नीची नावे आहेत. प्रसन्ना प्रमोदराव मंगरूळकर (वय ३२, रा. खेड मक्ता, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी शगुन रघुनाथ काटे (वय २६, रा. दापोडी गावठाण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटे दाम्पत्य हे शनिवारी (ता.११) मध्यरात्री दहा वाजण्याच्या घरात बसले होते. तेव्हा आरोपी प्रमोद मंगरूळकर याने दोघांवर टीकावाने वार करून हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपी प्रमोद रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर भोसरी पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने सर्व हकिकत सांगितली.
आरोपी प्रसन्ना मंगरुळकर हा उच्चशिक्षित असून त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तसेच त्याची आई ही चंद्रपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. प्रसन्नला पिंपरी चिंचवड शहरात एका बँकेत नोकरी लागली. त्यानंतर सन २०१५ मध्ये तो आणि त्याची आई दापोडी गावठाण येथे राहायला आले. त्यावेळी ते दोघे मयत काटे यांच्याकडे भाडेकरु म्हणून राहत होते.
दरम्यान, दोन वर्षे काटे यांच्या खोलीत भाड्याने राहत असताना काटे याने आईवर अत्याचार केला. त्यानंतर ते दोघे तळेगाव दाभाडे येथे राहण्यास गेले. काही दिवसांतच म्हणजे २०१७ ला त्याच्या आईचे देखील निधन झाले.
त्यामुळे तो एकटा पडला. व त्याने युपीएससी करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. परंतु काटे हे सतत त्रास आणि धमकी देत असल्याचा दावा त्याने केला. त्यातच आईवर झालेल्या अत्याचाराचा राग त्याच्या डोक्यात होता.
या घटनेचा बदला घेण्यासाठी प्रसन्ना याने शनिवारी विमानाने थेट दिल्ली वरुन पुणे गाठले. बॅगेत एक ब्लँकेट, टॉवेल, आणि दीड हजार रुपये घेऊन तो शनिवारी पुणे विमानतळावर आला. तेथून तो पायी चालत दापोडी येथे आला.
त्याने एका दुकानातून जमीन खोदण्याचा टीकाव खरेदी केला आणि काटे यांच्या घरी गेला. त्याने शंकर काटे यांचा टीकावाने मारुन खून केला. त्याला प्रतिकार करणाऱ्या काटे यांच्या पत्नीला देखील त्याने मारुन टाकले. अशी आरोपीने पोलिसांना कबुली दिली आहे.