सोलापूर : (Dharashiv Accident) आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी (Tulja Bhavani’s darshan) निघालेल्या नाशिक (Nashik) येथील भाविकांच्या चारचाकी गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी (ता. २१) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर उस्मानाबादच्या (Dharashiv Accident) सीमेवर हा अपघात झाला आहे. (Dharashiv Accident)
अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे
निखिल रामदास सानप (वय २१ वर्ष, रा. चास, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक), अनिकेत बाळासाहेब भाबड (वय २२ वर्ष, रा. चास, तालुका सिन्नर, जि. नाशिक), अथर्व शशिकांत खैरनार (वय २२ वर्ष, रा. चास, तालुका सिन्नर, जि. नाशिक) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तर गणेश नामदेव खैरनार (वय ३२), पंकज रवींद्र खैरनार (वय ३०), जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बिडकर (वय २२), दीपक बिडकर (वय २४, रा. चास, ता. सिन्नर जि. नाशिक अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापुरातून नाशिक येथील भाविक तुळजापूर येथील आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते. बोलेरो गाडी सोलापूरहून तुळजापूरच्या दिशेने निघाली होती. सोलापूर उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कटारे स्विमिंगजवळ अतिशय वेगात असलेल्या वाहनाचे अचानक टायर फुटले. त्यामध्ये बोलेरो वाहन तीन ते चार वेळा पलटी झाली आणि यात तिघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर या सर्वांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे तपासणी केली असता तिघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर पाच जणांवर उपचार सुरू केले. अपघातातील जखमींपैकी तिघांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.