पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (27 ऑगस्ट) संपूर्ण पुणे शहर आणि जिल्ह्यात मद्य विक्रीवर बंदी (ड्राय डे) घातली होती. मात्र या आदेशाचा भंग करून शहराच्या मध्यवस्तीत उघडपणे दारू विक्री सुरू असल्याचे समोर आले. खडक पोलिसांच्या पथकाने शुक्रवार पेठ परिसरात छापा टाकून देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव विजय डोंगरे (वय 26), गुड्डू कुमार भोलाकुमार कुमार (वय 26) आणि मटका अड्डा चालक नंदू नाईक (रा. सर्वे, शुक्रवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री शाहू चौकाजवळील रोनक बारमध्ये ही कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दारूबंदीचे आदेश जारी केले होते. त्यानुसार बुधवारी शहर आणि जिल्ह्यात दारू विक्री संपूर्णपणे बंद ठेवण्याचे बंधनकारक होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यवस्तीत विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवले होते.
खडक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर, पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण, हर्षल दुडूम, किरण ठवरे, नदाफ, फरांदे, गोरे यांच्यासह पथक बुधवारी सायंकाळी गस्त घालत असताना शाहू चौक परिसरात एका उपाहारगृहाच्या पाठीमागील खोलीत बेकायदा दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता वैभव डोंगरे आणि गुड्डू कुमार हे दोघे विक्री करताना आढळले. त्यांच्या ताब्यातून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, रोख रक्कम आणि मोबाइल संच असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत डोंगरे आणि कुमार यांनी नंदू नाईकच्या सांगण्यावरून दारू विक्री करत असल्याचे कबूल केले. त्यानंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या पथकाने केली.







