पुणे : स्वत:च्या फायद्यासाठी कार्यालयातील शिपायाने लोहमार्ग उपअधीक्षकांच्या नावाने खोट्या सह्या व शिक्क्यांचा वापर करून एका बड्या हॉस्पिटलकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार ७ नोव्हेबर २०२२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला होता.
एस. सोनवणे असे लोहमार्ग मुख्यालयातील कार्यालयीन कर्मचारी शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी लोहमार्ग उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एस. सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी येथे लोहमार्ग पोलीस मुख्यालय आहे. पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या कार्यालयात सोनवणे हा शिपाई आहे. त्याने फिर्यादी यांची परवानगी शिवाय कार्यालयात प्रवेश करुन कुलूप उघडले. चंद्रकांत भोसले व पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे या नावाचा गोल शिक्का तसेच फिर्यादी यांच्या खोट्या सहीचा वापर करुन स्वत:च्या फायद्यासाठी बनावट पत्र तयार केले. ते खरे असल्याचे भासवून त्याने ते दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांना पाठविले.
दरम्यान, सोनावणे याने हॉस्पिटलकडील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. हा प्रकार आता लक्षात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनवणे यांच्याकडे चौकशी केल्यानंतरच त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज का मागितले, हे समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक वालकोळी तपास करीत आहेत.