खडकवासला : पुणे पानशेत रस्त्यावरील सोनापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्यावरती एका तरुणाचा व तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्हीही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
स्थानिक नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, सोनापूर गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राला लागून एका बाजूने पुणे-पानशेत रस्ता व दुसऱ्या बाजूने एनडीए ते वरसगाव रस्ता आहे. दोन्ही बाजूने कुंपण किंवा संरक्षक भिंत नसल्याने अनेक ठिकाणी तरुण-तरुणी धरणाच्या पाण्यात उतरतात. रस्त्याच्या बाजूला स्थानिक नागरिकाचे दुकान आहे.
बुधवारी (ता. २१) सदर दुकानदार टपरीजवळून जात असताना त्याला रस्त्याच्या कडेला एक दुचाकी दिसली. आजूबाजूला कोणीही न दिसल्याने त्याने पुढे धरणाच्या पाण्याकडे जाऊन पाहिले असता पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे त्या विक्रेत्याला दिसून आले. त्याने तातडीने ही माहिती हवेली पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्ग्दर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण ताकवणे हे घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका चालक अनिल कांबळे व इतर स्थानिकांच्या मदतीने तरुण व तरुणी या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
दरम्यान, दोन्हीहि मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही परंतु दुचाकीच्या नंबर वरून दोघांपैकी एक जण सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील असावा अशी शक्यता पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण ताकवणे यांनी वर्तवली आहे. पुढील तपास प्रवीण ताकवणे करीत आहेत.