दिनेश सोनवणे
दौंड : ”गोहत्या” करून ”गोमांस विक्री” करणाऱ्या दौंड शहरातील इदगा मैदान परिसरात असलेल्या एका कत्तलखान्यावर दौंड पोलिसांनी धाड टाकून एकाला अटक केली आहे. तर या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
इद्रिस अबिद कुरेशी ( धंद्याचा मूळ मालक, रा. कुरेशी गल्ली दौंड), किरण पांडुरंग कुंभार (रा. शिंदेवाडी, ता. माळशिरस जिल्हा सोलापूर), मुश्रीफ कुरेशी आणि बबलू कुरेशी (रा. बारामती) यांच्या विरोधात गोवंश हत्या (सुरक्षा) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा 1995, भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड शहरातील इदगा मैदान परिसरातील कत्तलखान्यात इद्रिस आबिद कुरेशी जनावरांची कत्तल करून त्यांचे गोमांस विक्री साठी पाठविणार असल्याची माहिती बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे यांनी तत्काळ, शहरात रात्रीच्या गस्तीवर असणारे पोलीस निरीक्षक विनोद घुगे व पोलीस उपनिरीक्षक सुनिता चवरे व पथकास सोबत घेऊन शहरातील इदगा मैदान परिसरातील या बेकायदेशीर कत्तलखान्यावर धाड टाकली. या कारवाईत एका आरोपीला रंगे हात पकडण्यात आले आहे. इतर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.
दरम्यान, कत्तलखान्याच्या ठिकाणाहून कत्तल केलेल्या जनावरांचे मांस,७ जिवंत जनावरे व २ चार चाकी वाहने असा सुमारे ४ लाख २ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेली जनावरे बोरमलनाथ येथील गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. तर चार जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गोवंश हत्या (सुरक्षा) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा 1995, भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे,पोलीस उप निरीक्षक सुनिता चवरे, पोलीस कर्मचारी विकास गावडे, पांडुरंग थोरात, महेंद्र लोहार, निखिल जाधव, अमीर शेख, रवींद्र काळे, योगेश गोलांडे आणि सुरेश चौधरी यांच्या पथकाने कारवाई केली.