दौंड : दौंड शहरात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बला-त्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी एकाला अटक केली आहे.
ओंकार जोगदंड ( रा. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी (ता.२९) रोजी घरी एकटी असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी ओंकार तसेच त्याच्या नात्यातील एक महिला तेथे आली. त्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलीला कशाची तरी फूस लावून घेऊन गेले.
दरम्यान, पीडित मुलगी घरी आली असता, तिच्या आईने तिला विचारले की, ओंकार व संबंधित महिलेने तुला कोठे नेले होते? तेव्हा तिने सांगितले की, त्यांनी मला त्यांच्या घरी नेले व ओंकार याने मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून शारीरिक सुखाची मागणी केली.
त्यास नकार दिल्याने त्याने मला मारहाण केली. तसेच पीडित मुलीने पुढे सांगितले की, ऑगस्ट २०२२ मध्ये देखील आरोपीने मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर दोन ते तीन वेळा अत्याचार केला आहे.
याप्रकणी दौंड पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी ओंकार जोगदंड याला बेड्या ठोकल्या आहेत. तर एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.