संदीप टूले
Daund News दौंड : एका परप्रांतीय कामगाराचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक राहू (ता. दौंड) येथील सोनवणे डेअरी फार्म परिसरात सोमवारी (ता. २४) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे राहूसह दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (Daund News)
भीमकुमार अनिल यादव (वय-३०, मूळ रा. जयपूर, ता. मेहंदीया, जि. आरवल, बिहार) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी राहूचे पोलिस पाटील सुरेश सोनवणे यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमकुमार हा विजय ऊर्फ रामराव शहाजी सोनवणे यांच्या ‘सोनवणे डेअरी फार्म’या म्हशीच्या गोठ्यावर कामाला होता. मात्र सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भीमकुमार यांचा मृतदेह महादेव तुकाराम शिंगारे यांच्या विहिरीच्या पाण्यात तरंगताना काही कामगारांना आढळून आला. कामगारांनी या घटनेची तत्काळ माहिती पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच, दौंडचे पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व नागरिकांनी भीमकुमार मृतदेह बाहेर काढला.
दरम्यान, या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले आहे. त्यांमुळे या तरुणाची हत्या झाल्याच्या अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भीमकुमारचा खून नेमका कशामुळे व कोणत्या कारणांमुळे झाला आहे. याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पुढील तपास यवत पोलीस करीत आहे.