Daund News : यवत : वरवंड (ता. दौंड) येथील चौघांनी शेतीची अवजारे, ट्रॅक्टर, मोटरसायकल अर्ध्या किंमतीत विकत देतो असे सांगून, डाळिंब येथील महिलेची ७ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केली. यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
तिघांना अटक
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वरवंड येथील स्वाती चंद्रकांत केदारी, चंद्रकांत मल्हारी केदारी, सौरभ चंद्रकांत केदारी व गौरव चंद्रकांत केदारी यांनी जुलै २०२० पासून डाळिंब येथील कोमल अमोल सुतार यांना अर्ध्या किमतीत शेतीची विविध अवजारे, ट्रॅक्टर व मोटरसायकल विकत देतो, असे आमिष दाखवून, विश्वास संपादन केला. या विश्वासावर रोख रक्कम १ लाख ४० हजार रूपये व ऑनलाईन रक्कम ५ लाख ८९ हजार रूपये अशी एकूण रक्कम ७ लाख २९ हजार रूपये त्यांच्याकडून घेतले. मात्र, त्याबदल्यात कोणतीही वस्तू न देता फसवणूक केली.
या फसवणुकीची तक्रार कोमल अमोल सुतार यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली. त्यानंतर स्वाती चंद्रकांत केदारी (वय ४०). चंद्रकांत मल्हारी केदारी (वय ४८), सौरभ चंद्रकांत केदारी (वय २२), गौरव चंद्रकांत केदारी (सर्व रा. वरवंड, ता. दौड, जि. पुणे) या चौघांविरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत. यातील आरोपींनी इतरांची देखील अशाच प्रकारे फसवणूक केल्याची शक्यता असून, ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे, त्यांनी यवत पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.