दिनेश सोनवणे
दौंड – दौंड शहरात पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा नायलॅान मांजाने भरचौकात गळा चिरल्याने एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला आहे. बंदी असलेल्या नायलॅान मांज्याने हा बळी घेतला आहे. बंदी असतानाही दौंड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर नायलॅान मांजाची विक्री सुरू आहे. पन्नालाल यादव (वय ४५, रा. पासलकर वस्ती, लिंगाळी, मूळ रा. गोरखपूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटी पध्दतीने बांधकामाशी संबंधित कामे पन्नालाल यादव हे आपल्या सहकार्यांसमवेत घेत असत. दौंड शहरातील अहमदनगर काष्टी या रा रस्त्यावरील नगर मोरी चौकातून पन्नालाल यादव हे एका सहकारी समवेत दुचाकीवरून जात असताना दुपारी हा प्रकार घडला. अचानकपणे समोर आलेल्या नायलॅान मांजाचा त्यांच्या गळ्याला फास पडला व रक्तस्त्राव सुरू झाला. येथील नागरिकांनी त्यांना तत्काळ दौंड उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.
परंतु उपजिल्हा रूग्णालयातील डॅाक्टरांनी सुमारे १५ मिनिटे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु पन्नालाल यादव यांना ते वाचवू शकले नाहीत. मांज्यामुळे श्वासनलिका व रक्तवाहिन्या चिरल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याची माहिती रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. दत्तात्रय वाघमोडे यांनी दिली. पन्नालाल यादव यांचे पार्थिव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.