पुणे : कर्ज मंजुर करून देण्याचे बहाण्याने पुण्यातील एका प्रसिद्ध आयटी कंपनीतील अभियंत्याला सायबर चोरट्याने २८ लाखाचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीस आहेत. तक्रारदार यांचे वडील आजारी असून त्यांचा पत्नीशी झालेल्या वादातून न्यायालयात दाखल केलेल्या घटस्फोटाच्या खटल्यासाठी तक्रारदार तरुणाला पैशांची गरज होती. या दरम्यान, तक्रारदार यांनी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या खासगी वित्तीय संस्थांशी संपर्क साधला होता.
यादरम्यान, सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइलवर संपर्क साधला आणि तक्रारदार यांना कमी व्याजदरात ४० लाख रुपये कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखविले. कर्जमंजुरी प्रक्रियेसाठी दीड लाख रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाने ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांच्या खात्यावर दीड लाख रुपये पाठविले. चोरट्यांनी वेगवेगळी कारणे सांगून तरुणाकडून २७ लाख ४५ हजार रुपये उकळले.
त्यानंतर तरुणाला कर्ज मंजूर झाले नसल्याने संशय आला. तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने तातडीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने करीत आहेत.