Cyber Crime | पुणे : तात्काळ ऑनलाइन कर्ज घेणे दाम्पत्यास चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने दाम्पत्याची तब्बल साडेनऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यवसायासाठी कर्जाच्या गरजेतून ही फसवणून करण्यात आली आहे.
याप्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फसणवूकीची तक्रार दाखल केली आहे. त्यावरून मनोजकुमार नावाच्या सायबर चोरट्याच्या विरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्वरित ऑनलाइन कर्ज…
मिळालेल्या माहितीनुसार, व्यवसायासाठी दाम्पत्याला कर्जाची आवश्यकता होती. त्यावेळी सायबर चोरट्याने त्वरित ऑनलाइन कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर चोरट्याने तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठविली होती.
मनोजकुमार याच्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. तेव्हा कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी काही रक्कम भरावी लागेल, अशी बतावणी मनोजकुमारने त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना ऑनलाइन पद्धतीने काही रक्कम पाठविण्यास सांगितले. कर्जमंजुरीच्या आमिषाने दाम्पत्याकडून वेळोवेळी नऊ लाख ३७ रुपये चोरट्याने उकळले.
त्यानंतर चोरट्याने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दाम्पत्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!