Cyber Crime | पुणे : ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन व्हिडिओंना लाईक करुन चांगले पैसे देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा घातल्याचे प्रकार समोर येत आहेत. असे असताना एका ४२ वर्षीय तरुणाची चित्रपटाला रिव्ह्यू दिला तर पैसे देण्याचे आमिष दाखवत तब्बल २१ लाख ३३ हजार ८८० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी भूषण सुभाष मेटे (वय ४२, रा.शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवार पेठ परिसरात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीला अनोळखी नंबरवरून व्हाट्सअँप वर मेसेज आला होता. चित्रपटाला रिव्ह्यू देऊन टास्क पूर्ण केले तर चांगला मोबदला मिळेल, असे मेसेजमध्ये लिहिलेले होते. एक लिंक पाठवत टेलिग्रामवरील ग्रुपवर ऍड करून भूषण यांना डिपॉझिट भरण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला जमा केलेल्या रकमेचा परतावा देऊन आरोपीने भूषण यांचा विश्वास संपादन केला.
त्यांनतर वेगवेगळी कारणे देऊन विविध बँक खात्यांवर एकूण २१ लाख ३३ हजार ८८० रुपये जमा करून घेतले. मात्र काही काळानंतर जमा केलेल्या पैशांचा मोबदला मिळत नाही म्हणून भूषण यांनी अनोळखी मोबाईल क्रमांकावर फोन केला असता प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनतर भूषण यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेल्या संपूर्ण प्रकराचा जबाब दिला. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चुडाप्पा हे पुढील तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!