पुणे : जमिनी खरेदीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली पितापुत्रांनी ३० जणांची फसवणूक करून २०० कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपींवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दुबईला पसार झाले आहेत.
के. आर. मलिक आणि शाहरूख मलिक (मूळ रा. केरळ) असे गुन्हा दाखल झालेल्या पितापुत्रांची नावे आहेत. याप्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दुबई, सिंगापूर, बहरिन, मस्कत येथे त्यांनी आलिशान कार्यालये थाटली आहेत. तेथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग घेऊन आरोपींनी तेथील भारतीयांना भुरळ घातली. हिंजवडी, माण, मारूंजी, कासारसाई, जांबे या ठिकाणी जमीन खरेदी केल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल, असे सांगत त्यांनी जमीन खरेदीसाठी अनेकांकडून पैसे जमा केले.
आरोपींनी हिंजवडीतील एकाच प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या ५८२ जणांची सुमारे ६१ कोटींची फसवणूक झाली आहे. पुणे व परिसरातील ३० प्रकरणांमध्ये अशाप्रकारे फसवणूक केली आहे. आतापर्यंत २०० कोटींची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी के. आर. मलिक आणि शाहरूख मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींनी पुण्यासह परिसरातील नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे. आणि आरोपी दुबईला फरार झाले आहे. याप्रकरणी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी योग्य त्या हालचाली सुरु केल्या आहेत.
पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे म्हणाले कि, मलिक पिता-पुत्रांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत जवळपास ५८२ जणांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी हिंजवडीत दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपी सध्या परदेशात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने आवश्यक शासकीय प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर करीत आहेत.