Crime : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात अघोरी कृत्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आर्णी ते सावळी मार्गावरील केळझरा कोमटी शेतशिवारात एका महिलेच्या फोटोवर काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतात जादूटोण्याच्या विधीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. यात कापलेला कोंबडा, महिलांची साडी व ब्लाउज, दोन नारळ, चाकू, लिंबू, अंडी तसेच इतर पूजेचे साहित्य सापडले. याशिवाय, चार ते पाच कापडी बाहुल्या आणि पासपोर्ट आकाराचे फोटो आढळले. त्या फोटो व बाहुल्यांवर खिळे आणि टाचण्या टोचलेल्या अवस्थेत होत्या.

घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संपूर्ण साहित्य जप्त केले असून स्थानिकांच्या मदतीने ते नष्ट करण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तपास सुरू असून, हा प्रकार कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याचा शोध पोलिस घेत आहेत.







