लोणी काळभोर, ता. 29 : लोणी काळभोर (ता. हवेली) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची 109 वी सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. 29) उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष रमेश यशवंत भोसले, उपाध्यक्ष राजश्री काळभोर, गुरुदेव काळभोर, बाळासाहेब जयवंत काळभोर, हेमंत गायकवाड, संजय काळभोर, सागर काळभोर, सचिन काळभोर, बाळासाहेब पर्वतराव काळभोर, अमोल कोळपे, वर्षा काळभोर, सचिन सुभाष काळभोर, दत्तात्रेय नरसिंग काळभोर, संतोष भोसले, माजी सरपंच नागेश काळभोर, राजू आबा काळभोर, सुभाष काशिनाथ काळभोर, ज्ञानेश्वर नारायण काळभोर, विठ्ठल रामचंद्र काळभोर, सूर्यकांत काळभोर, निलेश शिवाजी काळभोर, युवराज विलास काळभोर, सतीश काळभोर, बाजीराव बबन काळभोर यांच्यासह सभासद व मान्यवर उपस्थित होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष नर्सिंग काळभोर होते. संस्थेचे सचिव तानाजी शिवाजी देवकुळे आणि सहसचिव पूजा नीलेश गुजर यांनी संस्थेचा वार्षिक लेखाजोखा सभासदांसमोर मांडला. यावेळी सभासदांनी विविध विषयांवर चर्चा करून सभेतील ठरावांना मंजुरी दिली. संस्थेच्या एकूण 3 हजार 305 सभासदांपैकी 149 सभासद थकबाकीदार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. त्यापैकी 61 सभासदांची एकूण 49 लाख 35 हजार रुपयांची कर्जमाफी शासनाकडून करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, संस्थेच्या आर्थिक स्थितीचाही आढावा सभेत घेण्यात आला. संस्थेचे भागभांडवल 83 लाख रुपये, बँक कर्ज 4 कोटी 6 लाख रुपये, सभासद कर्ज 3 कोटी 30 लाख रुपये, गुंतवणूक 42 लाख रुपये, राखीव निधी 55 लाख रुपये, तर थकबाकी 2 कोटी 84 लाख रुपये असल्याचे सभासदांना सांगण्यात आले. चालू वर्षात संस्थेला 15 लाख रुपयांचा तोटा, तर संचित तोटा 72 लाख रुपये असल्याची माहितीही सभेत देण्यात आली. संस्थेचे लेखापरीक्षण ‘ब’ वर्गात झाले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या सभेचे सूत्रसंचालन संजय भालेराव यांनी केले. संस्थेचे माजी चेअरमन राहुल दत्तात्रय काळभोर यांनी उपस्थित शेतकरी सभासद व मान्यवरांचे आभार मानले. त्यानंतर सभेची सांगता करण्यात आली.






