रायपूर : सध्या श्रद्धा वालकर प्रकरण ताजे असतानाच असाच प्रकार छत्तीसगड येथून समोर आला आहे. एका प्रियकराने रायपूर पासून २०० किमी लांब प्रेयसीला नेवून तिची हत्या केली व जंगलात फेकून दिला. या घटनेचा तपास ओडिसा पोलिसांनी लावला असून या प्रकरणात आरोपी प्रियकर सचिन अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे.
तनु कुर्वे ही तरुणी छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील रहिवासी असून ती रायपूरच्या एका खासगी बँकेत नोकरीला होती. तिची ओळख बालनगीर येथील व्यवसायिक सचिन अग्रवाल याच्याशी झाली, आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. २१ नोव्हेंबर रोजी तनुचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तनुच्या कुटूंबियांनी रायुपर गाठताना येथील पंडरी येथील पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.
तनु बेपत्ता झाल्यानंतर देखील आरोपी सचिन तनुच्या कुटुंबियांच्या संपर्कात होता. तनु आणि त्याचे लग्न होईल, असे आश्वासन देखील तिच्या कुटुंबियांना देत होता.
ओडिसा पोलिसांना तनुचा मृतदेह मिळाला, व त्यांनी तपासाला सुरूवात केली. ओडिशा पोलिसांनी रायपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी तनुच्या कुटुंबियांना पाचारण करण्यात आले. ओडिसा येथे जात कुटुंबीयांनी तनूच्या मृतदेहाची ओळख पटवली.
रायपूरचे एसएसपी प्रशांत अग्रवाल यांनी खून प्रकरणावर सांगितलं की, “तरुण आणि तरुणी एकमेकांना आधीच ओळखत होते. काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी पंडरी पोलीस ठाण्यात तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. चौकशीत तरुण आणि तरुणी एकत्र ओडिसात गेल्याचं निष्पन्न झालं.
ओडिसात तरुणीला फिरायला नेण्याच्या बहाण्यानं आरोपी सचिनने तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी सचिनची चौकशी केली असता, तरुणीचे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचं आरोपी सचिनला कळाले होते. याच रागातून आरोपीने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. ओदिशातील बालंगीर येथे मुलीचा मृतदेह सापडला असून आरोपीला ओडिसा पोलिसांनी अटक केली आहे.