crime news : छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या दामिनी पथकाला बालविवाह रोखण्यात पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे बालविवाहबाबत माहिती मिळाल्यावर हे पथक स्वतः पाहुणे म्हणून लग्नाच्या मंडपात तब्बल एक तास बसून होते. वधू-वर लग्न मंडपात दाखल होताच पोलिसांनी खात्री केली आणि बालविवाह होण्यापासून रोखले. तसेच, दोन्ही कुटुंबांना पोलिसांनी समुपदेशन करून समज दिली.
कन्नड तालुक्यातील नवरदेव आणि पडेगावातील साईनगर, तथागत चौक परिसरातील नवरीचा बालविवाह होत असल्याची खबर दामिनी पथकाला मिळाली. त्यानुसार साध्या गणवेशात पोलीस लग्नस्थळी दाखल झाले. मंडपात वऱ्हाडी दाखल झाले होते. बाजुलाच स्वयंपाक सुरु होता. मात्र, नवरी अन नवरदेवाला मंडपात यायला काहीसा अवधी होता. पथक तब्बल तासभर मंडपात बसून राहिले. जेव्हा वधू-वर मंडपात आले त्यानंतर पोलिसांनी आपली ओळख देत त्यांना बालविवाह करण्यापासून रोखले.
वधूच्या आई धुणी-भांडी करण्याचे काम करते. त्यांना दोन मुली आहेत. डोक्यावरचे ओझे कमी करण्यासाठी आणि चांगले सोयरिक जुळून आल्यामुळे मुलीचे लग्न लावत होते, असे वधूच्या आईने सांगितले. मात्र, कायद्यानुसार हा गुन्हा आहे, असे समजावून सांगता पोलिसांनी सर्वांचे समुपदेशन केले. हा बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आले. मुलीचे 18 आणि मुलाचे 21 वर्षाहून अधिकचे वय हे लग्नायोग्य वय असते. मात्र, पडेगावात होणाऱ्या या लग्नात 15 वर्षांची मुलगी आणि 20 वर्षाच्या मुलाचे लग्न लावले जात होते. त्यामुळे येथे वधू आणि वर दोघेही अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगितले. तसेच, दोन्हीकडील पालकांना दामिनी पथकाने छावणी ठाण्यात नेले.