Crime | पुणे : रेल्वेचा प्रवास, सुखी आणि सुरक्षित प्रवास असे समजले जाते. बसण्यास जागा देण्यावरून वाद विवाद होत असतात. याघटना नव्या नाहीत. परंतू सात जणांच्या अज्ञात टोळक्यानी दांडगाई करत एका इंजिनिअर तरूणाला रक्त येईपर्यंत गंभीर मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हा प्रकार सोमवारी (ता. 24) रोजी सकाळी सव्वा सात वाजता सिंहगड एक्सप्रेसमध्ये घडला.
याबाबत संदीप सिद्राम गोंदगावे (37, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 24) रोजी सकाळी सव्वा सात वाजता गोंदगावे मुंबई येथे जाण्यासाठी सिंहगड एक्सप्रेसमध्ये लोणावळा बोगीत चढले. त्यावेळी रेल्वतील एक प्रवासी व्यक्ती अगोदरच स्वतःच्या सीटबरोबरच अन्य दोन मोकळ्या सीट पकडून बसली होती. त्यावर फिर्यादी यांनी त्याला बसण्यास जागा देण्याची विनंती केली असता त्याने त्याला विरोध करत हुज्जत घालण्यास सुरूवात केली.
तसेच मारहाण करत पुढे ढकलत नेत मारहाण केली. पुढे त्याच्या सहा साथीदारांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गोंदगावे यांच्या नाका तोंडातून रक्त येत होते. तसेच त्यांचा डोळाही टोळक्याने सुजवला. पुढे गोंदगावे सीएसटी स्टेशन येथे साडेदहाच्या सुमारास उतरले. तेथून उतरून ते पुन्हा पुण्यात एसटीने आले. पुणेस्टेशन येथे आल्यानंतर त्यांनी याबाबत फिर्याद दिली असून सात जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.