तामिळनाडू : तमिळनाडूमधील मंडियमम्न मंदिराच्या मैलार उत्सवात एक क्रेन कोसळल्यामुळे तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
ज्योती बाबू, किलावथम भूपालन आणि मजूर मुठ असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किलीवेडी गावात मंडियमम्न मंदिर मैलार उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवादरम्यान एका क्रेनच्या मदतीने भलामोठा हार आणला होता. मात्र, क्रेनला जिथे हार लटकलेला होता, त्यावर काही तरुण उभे होते. पण, अचानक क्रेन डाव्या बाजूला सरकली तेव्हा तोल जाऊन क्रेन खाली आदळली.
क्रेन कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. तर ९ जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले .
जखमींना शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, अरक्कोनम शासकीय रुग्णालय आणि एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.