पुणे : मित्राच्या खूनाचा बदला घेण्यासाठी एकावर गोळीबार व कोयत्याने सपासप वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील शुक्रवार पेठ पोलीस चौकीकडुन श्रीनाथ टॉकीजच्या दिशेने जात असताना मंगळवारी (ता.२७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडल्याने दहशत निर्माण झाली आहे.
याप्रकरणी ४ हून अधिक जणांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश जाधव, गणेश इमुल, निरज कटकम, कृष्णा गाजुल व इतर इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शेखर अशोक शिंदे (रा. श्रीनिवास बिल्डींग फ्लॅट नं. ५०३, केशवनगर रोड, मांजरी) यांनी फराजखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर शिंदे हे दुचाकीवरून शुक्रवार पेठ पोलीस चौकीकडुन श्रीनाथ टॉकीजच्या दिशेने जात असताना, आरोपी रूपेश जाधव याने जीवे मारण्याच्या उद्देशाने शेखर शिंदे यांच्या डोक्याला पिस्टल लावून फायर केली. तसेच आरोपीच्या सोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने कोयत्याने डोक्यावर वार केला.
त्यानंतर आरोपी कृष्णा बिटकम याने शिंदे यांच्या तळव्यावर कोयत्याने वार होवून जखमी केले. तसेच तेथे हजर असलेल्या गणेश इमुल, निरज कटकम, कृष्णा गाजुल यांनी पकडून तुझ्या भावाने आमचा मित्र अक्षय वल्हाळ याचा खून केला म्हणून तुझा मर्डर करणार असे म्हणाला आणि शिंदे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त डॉ. संदीपसिंग गिल्ल, गुन्हे उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, फरासखाना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आरोपींच्या शोध घेत असून पुढील तपास फरासखाना पोलीस करीत आहेत