दिनेश सोनवणे
दौंड : दौंड (जि. पुणे) येथील उप जिल्हा रूग्णालयातून विवाह नोंदणीचे दुबार प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ सोमवारी (ता.१७) पकडले होते. हि घटना ताजी असतानाच, आता पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने डांगे यांच्या म्हाळूंगे येथील सदनिकेतून तब्बल १ लाख रूपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे.
याप्रकरणी संग्राम माणिकराव डांगे (वय ४६) याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक तानाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने डांगे यांच्या म्हाळूंगे (ता. मुळशी) येथील इन्सिया हाइट्स या इमारतीमधील सदनिकेची झडती घेतली. तेव्हा पथकाला डांगे यांच्या घरात विदेशी मद्याच्या एक लिटरच्या प्रत्येकी ०३ बाटल्या, ७०० व ७५० मिलीलीटरच्या ३५ बाटल्या आणि वाईनच्या ०६ बाटल्या, असा एकूण सुमारे १ लाख ०२ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल सापडला.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने डॉ. डांगे यांच्या घरी सापडलेला मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी डॉ. डांगे यांच्या विरोधात गुन्हा महाराष्ट्र (मुंबई) दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५ (ई) अन्वये डॅा. संग्राम डांगे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तर हि कारवाई पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क ` ड ` विभागाच्या पथकाने केली आहे.