पुणे : पुणे महापालिकेतील ज्युनिअर क्लार्क टायपिस्टच्या परीक्षेत मोबाईलचा वापर करुन कॉपी करताना एका उमेदवाराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हि घटना बुधवारी (ता. १२) एनडीए मधील इंडियन इंन्स्टुमेंट फॉर एरोनॉटीकल इंजिनिअरींग अँड आयटी शास्त्री कॅम्पसमध्ये बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पवन उत्तम मारक (वय-२५, रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्या उमेदवाराचे नाव आहे. तर त्याचा साथीदार अनिल भारती (रा. जालना) अशा दोघांवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुषार नामदेव बोरावके (वय ३१, रा. नऱ्हे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या ज्युनिअर क्लार्क, टायपिस्टपदाची बुधवारी लेखी परीक्षा होती. यातील एनडीएमधील केंद्रावर पवन मारक हा परीक्षेमध्ये मोबाईल व हेडफोनचा वापर करुन त्याद्वारे बाहेर असलेला मित्र अनिल भारती यांला संगणकावरील फोटो पाठवत होता.
दरम्यान, अनिल भारती हा त्याची उत्तरे पवन याला पाठवून कॉपी करत असताना त्याला पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देऊन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शबनम शेख अधिक तपास करीत आहेत.