दौंड : केडगाव (ता. दौंड) येथील जवाहलाल विदयालय व उच्च माध्यमिक विदयालयायात सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत केल्याप्रकरणी केंद्र संचालक व उपसंचालकासह नऊ शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी किसन दतोबा भुजबळ (विस्तार अधिकारी शिक्षण प्राथमिक विभाग पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार परीक्षा केंद्राचे संचालक जालिंदर नारायण काटे, उपसंचालक रावसाहेब शामराव भामरे, प्रकाश कुचेकर, विकास दिवेकर, कविता काशिद, शाम गोरगल, जयश्री गवळी, सुरेखा होन आणि अभय सोननवर (पुर्ण नांव व पत्ता माहीत नाही) या शिक्षकांवर महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड व इतर परीक्षा कायदा १९८२ च्या कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विस्तार अधिकारी किसन भुजबळ व त्यांच्या भरारी पथकाने केडगांव (ता. दौंड जि. पुणे) येथील जवाहरलाल विदयालय व उच्च माध्यमिक विदयालयात इयत्ता १२ वीचे केंद्र क्रमांक १९३ वर अचानक भेट दिली.
भेट दिल्यानंतर सामूहिक कॉपी करताना विद्यार्थी दिसले आणि भरारी पथकातील सिंघम अधिकारी किसन भुजबळ यांनी या प्रकारात मास्तरांनाच जबाबदार धरले. वरील शिक्षक यांनी परिक्षा ही कॉपीमुक्त न करता विद्यार्थांना मासकॉपी करण्यासाठी प्रतिबंध न करता, त्यांची अंगझडती न घेता, त्यांना कॉपी करणेसाठी उत्तेजन देवुन अप्रत्यक्ष रित्या सहाय्य केले आहे. आणि शिक्षकांमुळेच ही सामूहिक कॉपी झाल्याचे त्यांनी सांगत हा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास यवत पोलिस ठाण्याचे अंमलदार शेडगे करीत आहेत.