पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात किरकोळ कारणावरून एका बांधकाम मजुराचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर बांधकाम मजुराच्या डोक्यात वीट घालून निर्घुण खून करण्यात आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सिंहगड रस्ता परिसरात घडली. पिंटू गौतमदास (वय ३०) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, खून करून फरार झालेल्या आरोपीला मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. याबाबत पिंटूचा भाऊ छोटू याने तक्रार दिली आहे. यावरून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वडगाव बुद्रुक भागात सर्वे नंबर 37 अजिंक्यतारा इंडस्ट्रियल इस्टेट येथे एका बांधकाम साईटचे काम सुरू आहे. त्याठिकाणी दोघेही काम करत होते. दरम्यान त्यांना दारूचे व्यसन आहे. रविवारी या दोघांत वाद झाले होते. पिंटूने आरोपीला शिवीगाळ केली होती. याचाच राग आरोपीच्या मनात होता.
दरम्यान सोमवारी रात्री पाचव्या मजल्यावर दोघात वाद झाल्यानंतर आरोपीने पिंटूच्या डोक्यात वीट घालून त्याचा खून केला. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, रविवारी सकाळी काम सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. काही तासातच आरोपीला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.