पुणे : जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची गाडी तोडफोड तसेच राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन केल्याप्रकरणी ४३ पदाधिकाऱ्यांवर पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
निखिल वागळेंनी नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट करत खालच्या थराला जाऊन टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. शनिवारी ९ फेब्रुवारीला भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निर्भया बनो या कार्यक्रमस्थळी आमनेसामने आले होते.
मागील काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केले होते. केवळ प्रसिद्धीसाठी वागळे हे सातत्याने अशी भाष्ये करून सवंग लोकप्रियता मिळवत असतात. त्यांच्या भाषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
अशा वादग्रस्त माणसाचे भाषण पुण्यासारख्या शांतता प्रिय शहरात ठेवून पुण्याची शांतता बिघडवत असेल, तर ते भाजपा कदापि सहन करणार नाही. जर पोलिसांनी परवानगी दिली, तर आम्ही त्यांचे भाषण उधळून लावू असा कडक इशारा भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला होता.
नेमक काय घडल?
गेली ४५ वर्ष आपल्या निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे व्यवस्थेला सडेतोड सवाल करत आहेत. राज्यातील सत्तासंघर्ष तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवरून वागळे सरकारला चांगलेच धारेवर धरत आहेत. शुक्रवारी ९ फेब्रुवारीला पुण्यात ते एका कार्यक्रमासाठी आले होते.
यावेळी निखिल वागळे यांची कार पोलीस सुरक्षेत असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी शाईफेक करत त्यांचा कारवर अंडी फेकत काचा देखील फोडल्या. यावेळी निखिल वागळे आणि वकील असीम सरोदे हे गाडीतच होते. या संपूर्ण प्रकारानंतर पुण्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. त्यांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत धीरज घाटे यांच्यासह ४३ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.