पुणे : पुण्यात कॉम्प्युटर इंजिनियरने नोकरीस असलेल्या दुकानातून लॅपटॉप चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. लॅपटॉप चोरी करणाऱ्या संगणक अभियंत्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाकडून अटक करण्यात आलेली आहे. समीर रामनाथ थोरात (वय ३९) अस अटक करण्यात आलेल्या संगणक अभियंत्याच नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका संगणक विक्री व दुरुस्तीच्या दुकानात हार्डवेअर इंजिनिअर समीर थोरात याला सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान नोकरीस ठेवले होते. दुकानाचे मालक हे दुबई येथे गेले असता दुकानातील ४ लॅपटॉप आणि इतर साहीत्य तसेच ग्राहकांकडून कॉम्प्युटरचे साहीत्य असे परस्पर घेवून पसार झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा मागोवा घेत सापळा रचून त्याला अटक केली आहे. त्यानंतर गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचे लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी सहाय्य्क पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक व पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी केली आहे.