सागर जगदाळे
भिगवण : भिगवण (ता. इंदापूर) येथील श्रीनाथ चौकात कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.३०) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या तरुणांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पृथ्वीराज मारुती चव्हाण, अजय श्रीमंत चव्हाण (वय-१९, दोघेही रा. भिगवण वॉर्ड नं १. ता. इंदापुर जि. पुणे), सनी गुरगुळे (वय-२०, रा. मदनवाडी ता. इंदापुर जि. पुणे) व इतर ३ अनोळखी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन आबासाहेब निकम यांनी सरकारच्या वतीने भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिगवणमधील वर्दळीच्या ठिकाणी तरुणांच्या टोळक्याने एका दुचाकीवरील तरुणांना फिल्मी स्टाईल पद्धतीने लाकडी दांडक्याने, हातांनी मारायला सुरुवात केली. एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी हाणामारी भर चौकात चालु होती. जिवाच्या भीतीने मार खाणारा तरुण हा सैरभैर पळत सुटला.
परंतु हे मस्तवाल झालेले तरुण पुण्यातील कोयत्या गँगची जशी दहशत पसरत चालली असून खुलेआम जसे एका एखाद्याला मारायला मागेपुढे पाहत नाही. तसेच हे तरुण आम्हाला कोणी काही करू शकत नाही. या अविर्भावात तरुणाला मारण्यासाठी हातात दांडके घेऊन मागे पळत सुटली होती. या मोकाट, बेलगाम तरुणांना भिगवण पोलीस आवर घालणार का? की गांभीर्याने हे प्रकरण न घेता फक्त साधी दखल घेणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सदर मार खाणारा हा तरुण शेजारच्या तालुक्यातील असून तो स्वतःच्या दुचाकीवर भिगवणला आला होता. त्याची दुचाकी श्रीनाथ चौकात आली असता, पूर्ववैमनस्यातून किंवा इतर काही कारणास्तव, या तरुणाला मारण्यासाठी संशयित वरील ६ आरोपी हे दुचाकीवरून तेथे आले व त्यांनी सदर तरुणाला शिवीगाळ करत हातातील दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
परंतु जिवाच्या आकांताने तरुण हा पळत सूटल्यानंतर त्याच्या पाठीमागे हे तरुण हातात दांडके घेऊन मारण्यासाठी पळत सुटले व पुन्हा त्याला लाथा बुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहान केली. अचानकपणे घडलेल्या या प्रकाराने नागरिक मात्र भयभीत झाले होते. सदर सर्व तरुण हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असून मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये मध्ये दाखविलेल्या थरारक सीनप्रमाणे हे तरुण त्याच्या मागे पळत होते.
दरम्यान, सदर घटनेची फिर्याद पोलीस कर्मचारी सचिन आबासाहेब निकम यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या घटनेसाठी फिर्याद देण्यासाठी एकही सामान्य नागरिक पुढे आला नाही. प्रत्यक्ष बघ्यांनी ही फक्त बघ्याची भूमिका घेऊन फिर्याद देण्यासाठी मात्र कोणी पुढे सरसावला नाही. शेवट पोलिसांनाच ही जबाबदारी पार पाडून स्वतः ते फिर्यादी बनले आहेत.
भिगवणकर नागरीकांनी अशा प्रवृत्तीना थारा न देता या गोष्टींना विरोध करून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. नाहीतर“हम हैं यहा के बादशहा” असे म्हणणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना अभय मिळाल्याशिवाय राहणार नाही.