उरुळी कांचन, (पुणे ) : नवरात्रोत्सवासह सणांच्या पार्श्वभूमीवर घराला कुलूप लावून बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. सोरतापवाडी (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील उपळवस्ती येथे रविवारी (ता. ०२) मध्यरात्री सोने-चांदीचे दागिने व रोख रखमेसह ६ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी राजदीप रामदास यादव (वय- ३६, रा. उपळवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजदीप यादव हे सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील उपळवस्ती परिसरात राहत असून शेती व्यावसाय करतात. रविवारी संध्याकाळी त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त घराला कुलूप लावून निघून गेले होते. रविवारी मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
अज्ञात चोरट्यांनी घरातील ४ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व २ लाख ५ हजार रुपयांची रोख रक्कम असा ६ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेहला आहे. याप्रकरणी यादव यांनी लोणी काळभोर ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, रहिवाश्यांनीही आळीपाळीने आपापल्या परिसरात गस्त घालावी आणि चोरटा अथवा संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी तत्काळ संपर्क करून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.