पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सराईत गुन्हेगाराची टोळक्यांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. अमोल गोरगले (वय-३४, रा. पुनावळे गावठाण) असं खून करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि. ०१) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रावेत परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांना रावेत पोलिसांनी अटक केली आहे. अमोलचा मित्र यामध्ये जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणी शेखर अशोक ओव्हाळ, मुन्ना उर्फ अभिषेक ओव्हाळ, समीर शेख, महेश कदम, गणेश कदम आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील समाधान हॉटेलच्या मागील बाजूला अज्ञात इसमांनी गोरगले याच्यावर हल्ल्य चढवला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील समाधान हॉटेलच्या मागील बाजूला रात्री दहाच्या सुमारास बेसावध असलेल्या अमोल गोरगले याच्यावर सात ते आठ जणांनी धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेला अमोलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या वादातून हत्या
या खून प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा देखील सहभाग असल्याचं समोर आलं असून त्यांना रावेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अमोल गोरगले आणि ओव्हाळ या दोघामध्ये वाद झाले होते. त्यावरून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रावेत पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
अमोल गोरगले ३ महिन्यांपूर्वीच जेलमधून बाहेर आला होता
शेखर ओव्हाळ हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमोल गोरगलेला पोलिसांनी अटक केलं होतं. तीन महिन्यांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता.