पुणे : मित्राच्या घरी गेल्यानंतर मित्राची आई आणि बहिण रागावल्याने ११ वर्षाच्या चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोहिया नगर परिसरात घडली आहे.
रुद्राक्ष लुकेश जाधव (वय ११) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रुद्राक्षची आई आशा लुकेशा जाधव (वय ३२, रा. लोहियानगर ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विद्या चंद्रकांत कांबळे आणि साधना चंद्रकांत कांबळे (दोघी रा. लोहियानगर) या मायलेकींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी या एकाच वस्तीत राहतात. फिर्यादी यांचा मुलगा रुद्राक्ष हा सहावीत शिकत होता. तो आरोपींच्या घरी गेला असताना विद्या व तिची आई साधना कांबळे यांनी रुद्राथ याला वाईट शिवीगाळ केली होती. त्या रागातून रुद्राक्ष याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली होती.
दरम्यान, याप्रकरणी रुद्राक्षची आई आशा जाधव यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्या कांबळे आणि साधना कांबळे या मायलेकींवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.