परभणी : राज्यभर गणेश विसर्जनाचा आनंद साजरा करताना भाविक दंगून गेलेले असताना परभणीत मात्र डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी(दि. १७ सप्टेंबर) घटना घडली आहे. तसेच दोघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. दोघांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिंतुरहून परभणीला हलवण्यात आले आहे. परभणीच्या जिंतुर शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्री राजा शिवछत्रपती गणेश मंडळाची मिरवणूक शिवाजी चौकात आली होती. त्यावेळी सुरू असलेल्या डीजेमुळे संदीप कदम यांचा मृत्यू झाला तर शिवाजी कदम आणि शुभम कदम या दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवरही जिंतुर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना परभणीकडे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. सध्या जिंतुर ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तरुण जमले आहेत. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोचला असून परभणीतही पारंपरिक वाद्यांच्या गजरात मुख्य सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली होती. काही मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सजीव देखावे सादर केले आहेत, तर राजे संभाजी मित्र मंडळाने आदिवासी नृत्याचा देखावा केला होता. दुसरीकडे मानाचा मोठा मारुती संस्थानच्या ही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. त्या पाठोपाठ इतर मंडळांच्या मिरवणुका सुरु झाल्या होत्या. बालाजी गणेश मंडळाने राजस्थानच्या खातून बाबांचा देखावा परभणीकरांसमोर आणला आहे..