पुणे- चंदननगर परिसरात आठ दिवसापुर्वी सव्वीस वर्षीय कचरावेचक तरुणाचा गोळ्या घालुन खुन करणाऱ्या दोन फऱारी आरोपींना चंदननगर पोलिस व गुन्हे शाखेच्या युनिट चारने सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
अक्षय प्रकाश भिसे (वय २६, रा. एकनाथ पठारे वस्ती, चंदननगर) असे खून झालेल्या कचरावेचक तरुणाचे नाव असुन, त्याचा खुन केल्याप्रकरणी पोलिसांनी संतोष सत्यवान शिंदे (वय २८, रा. सध्या लोणी काळभोर ता. हवेली, मुळगाव – भालकी, जि. बीदर, कर्नाटक) आणि संग्राम उर्फ बाबू राजू बामणे (वय २६, रा. कानेपुरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. दरम्यान अक्षयचा खुन हा, त्याच्या पत्नीवरील एकतर्फी प्रेमातून झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
पोलिसांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय भिसे महापालिकेत कचरावेचक म्हणून नोकरीला होता. २१ ऑगस्टला सकाळी सहा वाजता तो कामावर जाण्यासाठी निघाला असता दोन हल्लेखोरांनी दुचाकीवरून पाठलाग करून दोन पिस्तुलांतून त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. घटनास्थळाच्या आसपास आसलेल्या सिसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात पोलिसांनी संशयितांची नावे मिळाली होती.
पोलिसांना चकवा देण्यासाठी, खुनाच्या गटनेनंतर संतोष शिंदे व त्याच्या सहकाऱ्यांनी पळुन जातांना तीन ते चार वेळा अंगातील जॅकेट बदलुन पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चंदननगर पोलिस व गुन्हे शाखेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या भेदक नजरेमुळे पोलिसांना वरील दोघांच्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते.
संतोष शिंदे व बाबु बामणे वेगवेगळ्या ठिकाणी लपत असले तरी, मागिल चार दिवसापासुन गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस वरील दोन्ही आरोपींचा शोध घेत होते. पोलिसांना वरील दोन्ही आरोपींची लोकेशन मिळताच, गुन्हे शाखा युनिट चारने वरील दोन्ही आरोपींना त्यांच्या मुळ गावातून बुधवारी अटक केली. त्यांचा ताबा चंदननगर पोलिसांकडे दिल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शिंदे याचे ओळखीच्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र प्रेम व्यक्त करण्यापुर्वीच तिचा विवाह अक्षय भिसे याच्यासोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यामुळे शिंदे याचा भिसेवर राग होता. शिंदे याने साथीदार संग्राम बामणे यांच्या मदतीने दुचाकी चोरली आणि भिसे याच्यावर पाळत ठेवून त्याचा खून केला.