चाकण (पुणे) : चाकण एमआयडीसीतील महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील एका दुकानासमोर गुरुवारी (ता. १९) रात्री झालेल्या खुनाचे गुढ उलघडण्यास महाळुंगे पोलिसांना यश आले आहे. किरकोळ कारणावरून मित्राचीच दगडाने ठेचून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी (ता.२०) रात्री उशिरा अटक केली आहे.
दीपक काशीराम राठोड (वय ३५, मूळ रा. वाशिम) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विठ्ठल मंगेश चव्हाण (वय २२, मूळ आंधबोरी, ता. किनवट, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपिचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार बाळकृष्ण पाटोळे यांनी याप्रकरणी महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक व विठ्ठल हे दोघे मित्र असून गुरुवारी रात्री दारू पिऊन चायनीज गाडीवर जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या दोघात किरकोळ कारणावरून वाद झाला. तसेच या वादाचे रुपांतर भांडणात होऊन त्यांच्यात झटापट झाली. आणि या झटापटीत विठ्ठल याने दीपक याच्या डोक्यात दगड घालून खून केला.
दरम्यान, दीपक याचा खून केल्यानंतर आरोपी विठ्ठल मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र महाळुंगे पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपी विठ्ठल यास बेड्या ठोकल्या. आरोपीला खेड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला मंगळवार (ता. २४) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, उपायुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर पाटील अधिक तपास करीत आहेत.